- पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात पुस्तकाचे सादरीकरण..
- कचरा व्यवस्थापनातील त्रुटी आणि भ्रष्ट व्यवस्थेवर प्रकाश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण अभ्यासक तथा प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी लिहिलेल्या ‘मोशी कचरा डेपो दुर्घटना’ या पुस्तकाची दिल्लीत दखल घेण्यात आली. पश्चिम विहार येथील रेडिसन ब्लू येथे आयोजित कार्यक्रमात या पुस्तकाचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात पुस्तकाचे सादरीकरण करण्यात आले.
मोशी कचरा डेपो येथे ७ जुलै २०२६ रोजी घडलेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी ४५ भागांच्या सत्यशोधक मालिकेच्या स्वरूपात हे पुस्तक लिहिले आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन, प्रशासकीय कार्यपद्धती, राजकीय हस्तक्षेप, आर्थिक व्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित विविध पैलू पुस्तकातून मांडण्यात आले आहेत.
कचरा डेपोच्या परिसराभोवती शहराचे सामाजिक व राजकीय ध्रुवीकरण कसे होते, कचरा व्यवस्थापनातील कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीचे स्वरूप काय असते आणि व्यवस्थेतील त्रुटींचे गंभीर परिणाम कसे समोर येतात, याचे विश्लेषण पुस्तकात करण्यात आले आहे. मानवनिर्मित दुर्घटना नैसर्गिक दुर्घटना असल्याचे चित्र निर्माण करण्याचे प्रयत्न कशा प्रकारे होऊ शकतात, याविषयीही लेखकाने निरीक्षणे नोंदवली आहेत.
या कार्यक्रमाला राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. अरविंद कुमार, पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदुभूषण मिश्रा, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या गढवाल, उत्तराखंड विभागाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र सिंह तोमर आणि डॉ. प्रदीप तिवारी उपस्थित होते. विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थ्यांसमोर लेखक डॉ. विजयकुमार पाटील यांनी पुस्तकातील विषयांची माहिती सादर केली.
सामाजिक प्रश्नांवरील लेखन काळाची गरज
सामाजिक प्रश्नांवर पुस्तकांच्या माध्यमातून समाजजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. अरविंद कुमार यांनी व्यक्त केले. घनकचरा व्यवस्थापनाची समस्या केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून ती जागतिक पातळीवरील पर्यावरणीय असंतुलनाशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदुभूषण मिश्रा यांनीही घनकचरा व्यवस्थापनातील समस्या आणि व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणारे लेखन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अशा पुस्तकांमधून समस्यांच्या मुळाशी असलेल्या बाबी समाजासमोर येण्यास मदत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या निमित्ताने कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि प्रशासकीय जबाबदारी या प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. या विषयावरील पुस्तकाची दिल्लीत दखल घेतली गेल्याने पिंपरी-चिंचवडमधील या गंभीर प्रश्नाला व्यापक स्तरावर व्यासपीठ मिळाले आहे.


















