- काळभोरनगरच्या स्पोर्ट्स क्लबमधील दुर्घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ६ ऑक्टोबर २०२६) :- चिंचवड एमआयडीसी परिसरातील काळभोरनगर येथे स्पोर्ट्स क्लबमध्ये उंचावरील पत्र्याची साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना शिडीवरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक कामगार जखमी झाला आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी न घेतल्याप्रकरणी ठेकेदाराविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास काळभोरनगर, एमआयडीसी चिंचवड येथील सोलारिस स्पोर्ट्स अँड लीझर क्लबमध्ये घडली. याप्रकरणी सिकंदर युनूस शेख (वय ५९, रा. कोथरूड) यांनी २७ ऑक्टोबर रोजी रात्री पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराने समीर सैफी आणि सुभान सैफी यांना उंचावरील पत्र्याची साफसफाई तसेच टेनिस नेट बांधण्याच्या कामासाठी लावले होते. कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने उपलब्ध असतानाही त्यांचा योग्य वापर न करता आणि आवश्यक सुरक्षिततेची खबरदारी न घेता काम करून घेतल्याचा आरोप आहे.
काम सुरू असताना समीर सैफी हा शिडीवरून खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर शिडी धरून उभ्या असलेल्या सुभान सैफीच्या हातालाही दुखापत झाली. गंभीर जखमी समीर याला निगडी येथील स्नोबेल मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी ७.५८ वाजता त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.


















