- २० रुपयांच्या नाण्याच्या बदल्यात ५५ लाखांचे आमिष पडले महागात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. २८ ऑक्टोबर २०२६) :- तुमच्याकडे २० रुपयांचे नाणे असेल, तर त्याच्या बदल्यात ५५ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची तब्बल १९ लाख ४ हजार ९०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रवींद्र बाबाजी उंदरे (वय ३२, रा. मरकळ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत फिर्यादी मोबाईलवर इन्स्टाग्राम रील्स पाहत असताना त्यांना २० रुपयांच्या नाण्याच्या बदल्यात ५५ लाख रुपये मिळतील आणि त्यासाठी केवळ ७५० रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल, अशी जाहिरात दिसली. या जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संबंधित आरोपींनी फिर्यादी यांना मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष दाखवले. त्यांच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी स्वतःच्या शिवकृपा पतसंस्था, आळंदी येथील खात्यातून ८ लाख ६२ हजार ९०० रुपये भरले. तसेच पत्नी अक्षदा रवींद्र उंदरे यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील खात्यातून आणि फोन-पेच्या माध्यमातून १० लाख ४२ हजार रुपये हस्तांतरित केले.
अशा प्रकारे फिर्यादी यांची एकूण १९ लाख ४ हजार ९०० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. एवढेच नव्हे, तर आरोपींनी फोनवरून अटक करण्याची धमकी देत फिर्यादी यांच्यावर दबाव आणल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.


















