- शेअर बाजारात पैसे वाढवण्याचे प्रलोभन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २८ ऑक्टोबर २०२६) :- ऑनलाइन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एका ४७ वर्षीय व्यक्तीची तब्बल १३ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सतीश अभिमन्यु पवार (वय ४७, रा. वाकड ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत फिर्यादी यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. या ग्रुपमध्ये विविध गुंतवणूक योजनांची माहिती देऊन पैसे गुंतवण्यास प्रोत्साहित करण्यात आले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक पाठवण्यात आली. या ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर एका अँड्रॉइड ॲपची लिंक देण्यात आली. फिर्यादी यांनी संबंधित ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून त्यावर आपली प्रोफाइल तयार केली. त्यानंतर आरोपींच्या सांगण्यावरून २५ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण १३ लाख ८९ हजार ९९९ रुपये गुंतवले.
दरम्यान, गुंतवणुकीची रक्कम वाढवण्यासाठी आणखी पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळे फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी याबाबत तपासणी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


















