- मोशीतील प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?..
- रावेतचा प्रस्ताव रद्द करण्याची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ ऑक्टोबर २०२६) :- रावेत सेक्टर २३ मधील सर्वे क्रमांक १५५, १५६, १५८ आणि १७७ येथे प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी विरोध दर्शविला आहे. मोशी येथील विद्यमान प्रकल्पातील समस्या दूर झाल्याशिवाय रावेतमध्ये नवीन प्रकल्प उभारू नये, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
रावेत परिसरातील वाढती निवासी वस्ती, शैक्षणिक संस्था आणि दुर्गा टेकडीच्या परिसराचा विचार करता प्रस्तावित प्रकल्पामुळे प्रदूषण, दुर्गंधी, वाहतूक आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य परिणाम होऊ शकतात, अशी चिंता तरस यांनी व्यक्त केली आहे. तसेच, परिसरातील देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण विभागाची भूमिका, सुरक्षा मानके आणि संभाव्य धोक्यांचा सखोल अभ्यास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रकल्पाचा स्वतंत्र पर्यावरणीय व सामाजिक परिणाम अहवाल (EIA) सार्वजनिक करावा, नागरिकांच्या हरकती मागवाव्यात आणि स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, पर्यावरणतज्ज्ञ व संरक्षण विभागाशी चर्चा करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
मोशीतील प्रकल्प पूर्ण क्षमतेने आणि सुरक्षितपणे कार्यरत झाल्यानंतरच नवीन प्रकल्पाचा विचार करावा, अशी मागणी करत तरस यांनी रावेतमधील प्रस्ताव रद्द करण्याची विनंती केली आहे. मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास परिसरात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


















