न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ ऑक्टोबर २०२६) :- चिखली आणि तळवडे परिसरातील नाल्यांवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी (दि. २७) करण्यात आलेल्या मोहिमेत पाच बांधकामे निष्कासित करून सुमारे ७०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले.
महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने प्रभाग क्रमांक १ मधील दक्षिण चिखली आणि प्रभाग क्रमांक १२ मधील तळवडे परिसरात ही कारवाई केली. नाल्यांवरील अनधिकृत बांधकामांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित संरचना हटविण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशानुसार, तर उपायुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


















