- वाघजाई पेट्रोल पंपाजवळ अपघात; गंभीर दुखापतींमुळे वृद्धाचा मृत्यू, एमआयडीसी भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १२ नोहेंबर २०२६) :- मोशी येथील बोरोडेवाडी परिसरातील जुना जकात नाका येथे भरधाव कारने पायी जाणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. भगवान धनसिंग बनसोड (वय ७५) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वाघजाई पेट्रोल पंपाजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान बनसोड हे पायी जात असताना मोशीकडून भोसरीच्या दिशेने जाणाऱ्या टोयोटा कंपनीच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. कारचालक यतीराज गौतम घायतिडक (वय ३२, रा. चिखली) याने वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या धडकेत भगवान बनसोड यांच्या छातीसह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी तुषार रोहीदास बनसोड (वय २३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडसे करीत आहेत.


















