- १०८ महागडी घड्याळे, ॲक्टिव्हा आणि मोबाईलसह ९ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १२ नोहेंबर २०२६) :- थेरगाव येथील डांगे चौक परिसरात दुकानाचे छताचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश करत महागडी घड्याळे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यातील १०८ महागडी घड्याळे, ॲक्टिव्हा आणि मोबाईल फोन असा एकूण ९ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ०९ वाजण्याच्या सुमारास ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान थेरगाव येथील डांगे चौकाजवळ असलेल्या दुकानाचे छताचे पत्रे उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील सुमारे ८ लाख २३ हजार रुपयांच्या महागड्या घड्याळांची चोरी केली होती. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाला सूचना दिल्या. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांनी डीव्हीआर काढून नेल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सुमारे १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
तपासादरम्यान संशयित आरोपी इसम नामे अमीर शब्बीर शेख (वय २८, रा. आदर्श नगर, किवळे, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदार इरफान हमीद मुलाणी (वय २९, रा. मुस्लिम वाडा, पद्मावती मंदिरामागे, उर्से, ता. मावळ, पुणे) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर दुसऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून १०८ ९ लाख ४ हजार रुपये किमतीचे महागडी घड्याळे, ५०,००० हजार रुपयांची ॲक्टिव्हा आणि ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण ९ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिसांनी केली.
या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे यांच्यासह वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

















