- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन..
- शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने नूतनीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ नोव्हेंबर २०२६) :-भारतीय जनता पार्टीचे शहर मध्यवर्ती कार्यालय हे केवळ पक्षाचे संघटनात्मक केंद्र न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणारे जनसेवेचे शक्तिकेंद्र ठरेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. मोरवाडी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) त्यांच्या हस्ते झाले.
शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. यामध्ये प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, डिजिटल मीडिया कक्ष, पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन आणि ग्रंथालयासह आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या माध्यमातून कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि नागरिकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा अधिक प्रभावी होणार आहे.
चव्हाण म्हणाले, पक्षाची खरी ताकद कार्यकर्त्यांच्या समर्पणात आणि जनतेच्या विश्वासात आहे. हे कार्यालय सत्तेचे नव्हे, तर सेवेचे केंद्र बनले पाहिजे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, संजय पटणी, वैशाली खाड्ये, प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, अभिषेक बारणे, सुजाता पालांडे, दिनेश यादव, सदाशिव खाडे, अनुप मोरे, राजेश पिल्ले, तेजस्विनी दुर्गे, शितल शिंदे, हेमचंद्र उर्फ राजू मासूळकर, नवनाथ ढवळे आणि अभिजित बोरसे यांच्यासह मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शत्रुघ्न काटे म्हणाले, कार्यकर्त्यांना सक्षम व्यासपीठ देऊन नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविणे, हा कार्यालयाचा मुख्य उद्देश आहे. प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली शहरात भाजपाचे संघटन अधिक मजबूत केले जाईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी केले. प्रास्ताविक शत्रुघ्न काटे यांनी, तर आभार विकास डोळस यांनी मानले.


















