- ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ उपक्रमाचा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ नोव्हेंबर २०२६) :- भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स, होर्डिंग, हार-तुरे आणि सत्काराला फाटा देत ५१ आदिवासी व दुष्काळग्रस्त गावांतील गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमाचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील ५१ गावांची निवड करण्यात आली आहे. ‘एक नगरसेवक, एक गाव’ या संकल्पनेतून प्रत्येक नगरसेवकाकडे एका गावाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक गरजू कुटुंबाला महिनाभर पुरेल इतके धान्य, किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले जाणार आहे. १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान मदतवाटपाचे नियोजन आहे.
यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, अमित घोडके, उमाताई खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप, मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, संजय पटणी, निलेश नेवाळे, निखिल बोराडे आदी उपस्थित होते.
महेश लांडगे म्हणाले, वाढदिवसाच्या जाहिरातींपेक्षा गरजूंच्या घरात महिनाभराचे अन्नधान्य पोहोचणे अधिक समाधानकारक आहे. शत्रुघ्न काटे यांनीही या उपक्रमातून लोकसेवेचा आदर्श निर्माण होत असल्याचे सांगितले.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लोकसहभागातून मदतकार्याचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.


















