- दोघांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न..
- पाचपीर चौकाजवळील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १३ नोव्हेंबर २०२६) :- काळेवाडी परिसरात अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केल्याची घटना समोर आली आहे.
पाचपीर चौकाजवळ घडलेल्या या प्रकारात दोन तरुणांनी मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच कोयता हवेत फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार राकेश वाल्मीकी (वय १६, रा. भारत माता चौक, काळेवाडी) हा पायी जात असताना वैभव देवीदास गणगोपाळ (वय १९) याने त्याला शिवीगाळ करून डाव्या हाताला पकडत मारहाण केली. त्यानंतर तुषारने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता वैभवने त्याला दोन्ही हातांनी पकडून ठेवले.
याचवेळी गौरव चंद्रकांत साळवे (वय १९) याने कमरेला असलेला लोखंडी कोयता काढून तुषारच्या डाव्या हातावर वार केला. त्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर दोघांनी कोयता हवेत फिरवत, “कोणीही मध्ये येणार नाही, कोणी मध्ये आल्यास त्याला सोडणार नाही,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वैभव गणगोपाळ याला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या आरोपीविरोधात पुढील कारवाई सुरू आहे. सपोनि नलावडे पुढील तपास करीत आहेत.

















