न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ नोव्हेंबर २०२६) :- वाकड येथील भूमकर चौकातील पु. ना. गाडगीळ (पी.एन.जी.) ज्वेलर्समध्ये गर्दीचा फायदा घेत हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपीसह दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
२० ऑक्टोबर २०२६ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे २९.८४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करण्यात आले होते. तसेच १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी १ लाख ८८ हजार रुपये किमतीचे ११.३७६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरी झाले होते.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. धनराज विजय परमार (४८) याला ११ नोव्हेंबर रोजी, तर सुचित्रा किशोर साळुंखे (७७) हिला १२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास सुरू आहे.

















