- ‘जय छठमाता’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला..
- सूर्यषष्ठी महाव्रत, संध्या अर्घ्य आणि भव्य गंगा आरतीने वातावरण भक्तीमय..
- पवना नदी घाटाच्या विस्तारीकरणाची विजय गुप्तांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ नोव्हेंबर २०२६) :- चिंचवडगावातील पवना नदी घाटावर आज रविवारी (दि. १५) सायंकाळच्या सुमारास उत्तर भारतीय बांधवांच्या श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या छठ महापर्वाचा उत्साह पाहायला मिळाला. हनुमान मित्र मंडळ आणि छठ पूजा समितीच्या वतीने आयोजित या भव्य धार्मिक उत्सवात शहरातील उत्तर भारतीय कुटुंबांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सूर्यदेव आणि छठी मातेच्या आराधनेने संपूर्ण घाट परिसर भक्तिमय झाला होता. ‘जय छठमाता’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

छठपर्वानिमित्त सूर्यषष्ठी महाव्रत, छोटकी छठ, संध्या अर्घ्य, महापूजा आणि भव्य गंगा आरतीसह विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे पवना नदी घाटावर आज आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात महिला भाविकांचा विशेष सहभाग दिसून आला. आपल्या कुटुंबाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्य लाभावे, तसेच कुटुंबातील सदस्यांचे जीवन निरोगी व आनंदी राहावे, या श्रद्धेतून महिला अत्यंत कठोर नियमांचे पालन करीत छठी मातेचे व्रत करतात. सूर्यदेवाची उपासना आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण उत्तर भारतीय समाजाच्या सांस्कृतिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो.

यावेळी छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते खंडूशेठ चिंचवडे, शशिकांत श्रीवास्तव, रणजित गुप्ता, हेमंत गुप्ता, अक्षय गुप्ता आदींसह हजारो उत्तर भारतीय भक्त भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सनी विजय गुप्ता, रवी विजय गुप्ता यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छठ पूजा समिती अध्यक्ष जितेंद्र क. गुप्ता, कार्याध्यक्ष शशिकांत श्रीवास्तव, उपाध्यक्ष देवानंद आर. गुप्ता, सचिव अशोक डी. गुप्ता, सदस्य जितेंद्र जे. गुप्ता, प्रेम शंकर राय फिल्म प्रोड्युसर, मुन्ना डी. गुप्ता, अनिल एस. गुप्ता, उमा के. गुप्ता, टी. एन. तिवारी, सुभाष एम. गुप्ता, श्यामसुंदर गुप्ता, मदन आर. गुप्ता, पप्पु डी. गुप्ता, सुजित एम. गुप्ता, शंकर गुप्ता, शंभू गुप्ता, रमेश गुप्ता, भोला बी. गुप्ता, मनोज आर. गुप्ता, राजेश जे. गुप्ता, विनोद गुप्ता, संतोष गुप्ता आदींनी परिश्रम घेतले.
दरम्यान छठपूजेच्या पारंपरिक विधींनुसार भाविकांनी घाटावर पूजेची विशेष मांडणी केली आहे. उसाच्या साहाय्याने मांडव तयार करून त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश, दिवा आणि पूजेचे साहित्य ठेवण्यात आले. खवा, गव्हाचे पीठ आणि तुपापासून तयार केलेला पारंपरिक प्रसाद, विविध फळे आणि नैवेद्य सूर्यदेवाला अर्पण करण्यात आले. सूर्यास्ताच्या वेळी महिला भाविकांनी नदीच्या पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला श्रद्धापूर्वक अर्घ्य अर्पण केले. पारंपरिक वेशभूषेतील महिला, पूजेची आकर्षक सजावट आणि भक्तिगीतांच्या स्वरांनी घाट परिसराला धार्मिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
यावेळी आयोजित भव्य गंगा आरतीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. धार्मिक आणि भक्तिपर गीतांच्या सादरीकरणामुळे उत्सवात अधिकच रंगत आली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटांतील नागरिकांनी या उत्सवात सहभाग नोंदविला. अनेक कुटुंबांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली. त्यामुळे चिंचवडमधील पवना नदी घाटावर उत्तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे.
छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता म्हणाले, हिंदू शास्त्रानुसार छठपूजेला सूर्यछठ अथवा छठपर्व असे संबोधले जाते. गेल्या २० ते २५ वर्षांपासून आम्ही चिंचवडगावातील पवना नदी घाटावर हा उत्सव साजरा करीत आहोत. दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असून, शहरातील उत्तर भारतीय नागरिक मोठ्या श्रद्धेने या उत्सवात सहभागी होतात. या धार्मिक उपक्रमासाठी महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांचे नेहमीच सहकार्य मिळते. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे आणि भाविकांच्या संख्येत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सध्याचा पवना नदी घाट अपुरा पडत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या घाटाचा विस्तार करावा. भाविकांसाठी प्रशस्त जागा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आमची मागणी आहे.
सोमवारी उषा अर्घ्याने होणार छठपर्वाची सांगता..
छठपर्वाच्या अखेरच्या दिवशी सोमवार (दि. १६ नोव्हेंबर) रोजी पहाटेपासूनच घाटावर भाविकांची गर्दी होणार आहे. व्रतस्थ महिला आणि पुरुष पवनामाईच्या पाण्यात उभे राहून उगवत्या सूर्यदेवाच्या दर्शनाची प्रतीक्षा करणार आहेत. सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला उषा अर्घ्य अर्पण केले जाणार आहे. छठी मातेचा जयघोष, पारंपरिक पूजाविधी आणि सूर्योपासनेनंतर या चार दिवसांच्या छठ महापर्वाची सांगता होणार आहे. श्रद्धा, संयम, निसर्गपूजा आणि कौटुंबिक कल्याणाचा संदेश देणारा हा उत्सव चिंचवडमधील उत्तर भारतीय बांधवांसाठी सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा महत्त्वपूर्ण सोहळा ठरत आहे.

















