- नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
- अपघात होण्यापूर्वी प्रशासन लक्ष देणार का?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण, पुणे (दि. २१ नोव्हेंबर २०२६) :- चाकण येथील मुख्य चौकात स्ट्रीट लाईटसाठी टाकण्यात आलेली विद्युत केबल उघड्या अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्य चौकात नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी पादचारी मार्गावरून स्ट्रीट लाईटची केबल टाकण्यात आली असून, संबंधित काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे.
केबल टाकण्यासाठी वापरण्यात आलेला नारंगी रंगाचा पन्हाळी पाइप पादचारी मार्गावर उघड्या अवस्थेत पडलेला आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या ठिकाणाहून जाताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पाइपमध्ये अडखळून पडल्यास नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता आहे.
मुख्य चौकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची केबल टाकताना नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, केबल टाकल्यानंतर पाइप व्यवस्थित जमिनीत बसविणे, परिसर पूर्ववत करणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे.
एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित ठेकेदार आणि जबाबदार विभागाने तातडीने या कामाची पाहणी करून केबल व पाइप सुरक्षितपणे बसवावेत आणि पादचारी मार्ग नागरिकांसाठी मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

















