- आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मंचाचा सेवाभावी उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ नोव्हेंबर २०२६) :- भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांच्या पुढाकारातून दुर्गम भागातील चार गावांतील ४५० आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. निलेशशेठ बोराटे युवा मंच आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती सभापती सुजाता निलेश बोराटे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
भोरगिरी, पाभे, भोबळे आणि बिव्हे या चार गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या संकल्पनेतून आयोजित उपक्रमाद्वारे दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आमदार महेश लांडगे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आला.
“महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गम भागातील गरजू कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला. ४५० कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवता आली, याचे समाधान आहे.” – निलेश बोराटे, सामाजिक कार्यकर्ते.

















