- नगरसविका शितल धनंजय वर्णेकर यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
जुन्नर, पुणे (दि. २१ नोव्हेंबर २०२६) :- आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. शितल धनंजय वर्णेकर, नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या, प्रभाग क्रमांक १२ यांच्या पुढाकारातून जुन्नर तालुक्यातील तांबे गण येथील खडकुंबे गावात १५० गरजू कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला गहू ५ किलो, तांदूळ ५ किलो, तूरडाळ १ किलो, साखर २ किलो, खाद्यतेल २ लिटर, बाजरी ३ किलो, चहा पावडर ५०० ग्रॅम, मसाला २५० ग्रॅम, बेसन १ किलो आणि मीठ ५०० ग्रॅम अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असलेला किराणा संच देण्यात आला.
दुष्काळग्रस्त व गरजू कुटुंबांच्या अडचणीच्या काळात त्यांना आधार मिळावा, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हातभार लागावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी खडकुंबे गावचे सरपंच किरण शेळकंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “लोकञनेते तथा आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त खडकुंबे गावातील १५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आमच्या गावासाठी अत्यंत मोलाचा आणि अभिमानास्पद आहे.
महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता, तो गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्यासाठी वापरण्याचा विचार कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रेरणेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सौ. शितलताई धनंजय वर्णेकर यांनी गावातील कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली, याबद्दल त्यांचे विशेष आभार.
आजच्या काळात एखाद्याच्या अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीशी उभे राहणे, त्याच्या कुटुंबाला आधार देणे हीच खरी माणुसकी आहे. ही मदत निश्चितच कुटुंबांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरेल. महेशदादांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या कार्यासाठी अधिकाधिक बळ लाभो, हीच खडकुंबे गावाच्या वतीने सदिच्छा. तसेच शितलताईंच्या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक आणि आभार!”
या उपक्रमाबाबत शितल धनंजय वर्णेकर म्हणाल्या, “आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा आणि उत्सव साजरा न करता, त्यांच्या वाढदिवसाचा आनंद गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलवता यावा, या भावनेतून हा छोटासा प्रयत्न केला आहे.
खडकुंबे गावातील १५० कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून मदतीचा हात पोहोचवताना मनाला खऱ्या अर्थाने समाधान मिळाले. एखाद्याच्या घरातील चूल पेटण्यासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला थोडासा हातभार लावण्यासाठी आपण उपयोगी पडतो, यापेक्षा मोठे समाधान दुसरे कोणतेही नाही.
माझ्यासाठी समाजसेवा ही केवळ जबाबदारी नसून माणुसकी जपण्याचे माध्यम आहे. पद असो किंवा नसो, गरजू माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसता आले आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवता आले, तर तेच माझ्यासाठी खरे यश आहे.
महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेला हा सेवाभावी उपक्रम म्हणजे समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेची एक छोटीशी अभिव्यक्ती आहे. यापुढेही गरजू नागरिकांच्या मदतीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.”
या उपक्रमासाठी खडकुंबे गावचे सरपंच श्री. किरण शेळकंदे आणि पोलीस पाटील बाळू विठ्ठल करवाडे यांचे सहकार्य लाभले.

















