- कचरा प्रश्नावरून महापालिका सभागृहात प्रशासनाला धरले धारेवर..
- आयुक्तांना दररोज कचऱ्याचे फोटो पाठविण्याचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 22 नोव्हेंबर 2026) :- शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावरून महापालिका सभागृहात मा. उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई अविनाश मोरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. दुर्गा टेकडी (निगडी) परिसरात प्रस्तावित असलेल्या वेस्ट टू एनर्जी (Waste to Energy) प्रकल्पाला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. या परिसरात शाळा आणि दाट लोकवस्ती असल्याने येथे हा प्रकल्प होऊ देणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली.
महापालिका सभागृहातील चर्चेदरम्यान शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या सद्यस्थितीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील विविध भागांत कचऱ्याची समस्या कायम असून, नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. कचऱ्याच्या प्रश्नामुळे नागरिकांच्या शिव्या खाव्या लागत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दुर्गा टेकडी परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करताना, या भागात शाळा आणि मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने अशा प्रकल्पाला परवानगी देता कामा नये, असे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत प्रशासनाला जाब विचारत राहणार असल्याचे सांगून, शहरातील कचऱ्याची छायाचित्रे दररोज आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठविणार असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कामकाजावरही त्यांनी गंभीर आरोप केले. पर्यावरण विभाग केवळ वसुलीच्या कामात गुंतला असून, प्रत्यक्ष स्वच्छता आणि नाले-जलवाहिन्यांमधील गाळ काढण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी जबाबदारीने काम करावे, अशी मागणी त्यांनी केली.

















