- भाजपच्या सचिन काळभोरांचा पक्ष नेतृत्वाला सवाल!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ नोव्हेंबर २०२६) :- भाजपमध्ये निष्ठेने काम करूनही वारंवार राजकीय संधींपासून डावलण्यात आल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते सचिन सुदाम काळभोर यांनी केला आहे. २०१७ आणि २०२६ मध्ये निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही, तसेच स्वीकृत नगरसेवकपदासाठीही विचार झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
२०१४ च्या भोसरी विधानसभा निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार एकनाथ पवार यांच्यासाठी प्रचार केल्यामुळे स्थानिक राजकीय नाराजीचा सामना करावा लागल्याचा दावा काळभोर यांनी केला आहे. महापालिका हद्दीतील दहा प्रभागांमध्ये नागरी प्रश्नांसाठी आंदोलने, मोर्चे आणि सातत्याने काम करूनही पक्षाने संधी नाकारल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
“पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी काम करणे ही माझी चूक होती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हस्तक्षेप करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

















