- कचरा संकलनातील दिरंगाईवर नाराजी..
- नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास कारवाईचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ नोव्हेंबर २०२६) :- निगडी प्राधिकरण परिसरातील कचरा संकलन व्यवस्थेतील ढिसाळ कारभारावर उपमहापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चारचौघांत धारेवर धरले. परिसरात नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
या पाहणीदरम्यान काही ठिकाणी कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे संतप्त झालेल्या उपमहापौरांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून तातडीने कचरा उचलण्याचे आदेश दिले. तसेच संपूर्ण परिसरात दररोज नियमित कचरा संकलन होईल, याची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले.
नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण मिळणे ही महापालिकेची जबाबदारी असून, स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या यंत्रणेवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

















