- पार्क स्ट्रीट, वाकड येथील उच्चभ्रु नागरिकांचा बिल्डरवर फसवणुकीचा आरोप..
- आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड, पिंपरी-चिंचवड (दि. २३ नोव्हेंबर २०२६) :- वाकड येथील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्क स्ट्रीटमधील नागरी प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. परिसरातील सुमारे तीन हजार कुटुंबे आणि पंधरा हजार नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत सोसायटीतील नागरिकांनी रस्त्यावर येत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, या सोसायटीच्या अगदी बाजूलाच शाळा असूनही परिसरात कथित अनधिकृत रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट उभारण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य, परिसरातील नागरिकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हा गंभीर प्रश्न असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या आरएमसी प्लांटला सोसायटीतील नागरिकांचा तीव्र विरोध असून, संबंधित प्लांटच्या उभारणीबाबत आणि परवानग्यांबाबत प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पार्क स्ट्रीट सहकारी गृहरचना संस्थेच्या परिसरातील सार्वजनिक रस्त्यालगत असलेली सुमारे १८ फूट लांब आणि ५ फूट उंच संरक्षक भिंत पाडण्यात आल्याची तक्रार वाकड पोलिसांकडे करण्यात आली आहे. तसेच भूमिगत केबलचे नुकसान केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३२४(२) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केल्याचे पोलिसांच्या कागदपत्रांत नमूद आहे.
संरक्षक भिंत पाडणे, भूमिगत केबलचे नुकसान आणि आरएमसी प्लांटची उभारणी या मुद्द्यांवरून परिसरातील वातावरण तापले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या सर्व बाबींचा परिणाम हजारो कुटुंबांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
या प्रकरणात स्थानिक नगरसेविकेसह सोसायटीतील नागरिकांनी आवाज उठवला आहे. नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, आरएमसी प्लांटच्या परवानग्यांची तपासणी करावी आणि संरक्षक भिंत व भूमिगत केबलच्या नुकसानीची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
इतकेच नव्हे, तर या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही हस्तक्षेप करून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
तीन हजार कुटुंबे आणि पंधरा हजार नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासन आता किती गांभीर्याने पाहणार? शाळेच्या शेजारी उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत आरएमसी प्लांटवर कारवाई होणार का? याकडे पार्क स्ट्रीटमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

















