न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या गृहप्रकल्पांसाठी पुन्हा अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यातील पात्र अर्जातून गृहप्रकल्प पसंती निश्चित केली जाणार आहे. लॉटरी पद्धतीने अंतिम यादी करून सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पालिकेने शहरातील विविध ठिकाणी गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यापैकी च-होली, बो-हाडेवाडी, रावेत व उद्यमनगर -पिंपरी या ४ गृहप्रकल्पास राज्य शासनाच्या व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाची ‘कॉन्स्टंट टू इस्टॅब्लिश’ (सीटीई) परवानगी मिळाली आहे. त्यानुसार च-होली व उद्यमनगरचे काम सुरू करण्यात आले आहे.
आकुर्डी प्रकल्पाची परवानगी शिल्लक आहे. इतर गृहप्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील या योजनेसाठी थेट व ऑनलाइन माध्यमातून सुमारे एक लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. पुन्हा नव्याने अर्ज मागविण्यात येणार आहे. त्यातून पात्र अर्जदारांकडून गृहप्रकल्प पसंती निश्चित केली जाणार आहे. या अर्जासाठी शुल्क असणार आहे. प्रकल्पात नियमानुसार काही सदनिकांचे आरक्षण असणार आहे. अर्जातून लॉटरी पद्धतीने पात्र लाभाथ्याची अंतिम यादी केली जाणार आहे. त्यांना सदनिकेचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेची माहिती पालिका पदाधिकारी व नगरसेवकांना देण्यात येणार आहे. त्यांच्या सहमतीतून सदनिका वितरणाच्या प्रक्रियेस अंतिम रूप दिले जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.











