न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून) :- पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात केवळ १३ टके पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा कमीत कमी वापर करून बचत करावी, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरूवार (दि. २७) रोजी केले.
पवना धरणातील अल्प पाणीसाठा आणि धरण परिसरात जून पाणी महिना संपत आला तरी, पावसाने दमदार हजेरी न लावल्याने पाण्याची चिंता वाढली आहे. सध्या केवळ १३ टक्के पाणीसाठा आहे. या संदर्भात आयुक्त म्हणाले की, धरणात कमी पाणी साठा आहे. मृत पाणीसाठा धरल्यास ते पाणी ४० दिवस पुरेल इतके आहे. तसेच, पाऊस समाधानकारक नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा कमीत कमी वापर करावा.
पाण्याची बचत करून पालिकेस सहकार्य करावे. पालिकेतर्फे सध्या दररोज ४०० ते ४१० एमएलडी पाणी उचलले जात आहे. सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (दि. १) रोजी बैठक घेण्यात येणार आहे. धरणातील पाणीसाठा व पावसाने दिलेली ओढ या बाबींचा विचार करून पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल. सुरू असलेली दिवसाआड पाणी कपात कायम ठेवायची की दोन दिवसांआड पाणीकपात लागू करायची याबाबत बैठकीत निर्णय होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.











