न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मृत आदित्य हा त्याचा मित्र अदनान याच्या दुचाकीवरुन मुंबई-बँगलोर हायवेने चालला होता. ते सुर्या हॉस्पीटल समोरील रस्त्यावर पोहचले असता मागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने अदनान याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि पसार झाला. यामुळे मागे बसलेला आदित्य याचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी (दि. २९) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई-बँगलोर हायवेवर असलेल्या सुर्या हॉस्पीटल समोरील रस्त्यावर घडली. आदित्य राजेश मिश्रा (वय २७, रा. सी ४०२, पॅलोडीओ सोसायटी, ताथवडे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी अदनान अब्दुल खान (वय २६) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.











