न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०१९) :- सातवीच्या इतिहास या पुस्तकातील ‘शिवपूर्वकालीन भारत’ या धड्यामध्ये महाराणा प्रतापसिंह यांच्याबद्दल एकेरी भाषेचा उल्लेख केला गेला आहे. यामुळे संपूर्ण राजपूत बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राजपूत महिला मंडळाने निषेध व्यक्त करुन, शासनाने पुस्तक त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे.
मंडळाच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अखंड भारताचे सुपुत्र भारताचे राष्ट्रगौरव वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांनी देशासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. स्वाभिमानाने जगणा-या महाराजांबद्दल सातवीच्या पुस्तकात महाराणा प्रतापसिंह यांचा एकेरी भाषा वापरून उल्लेख केला गेला आहे. महाराणा प्रतापसिंह हे साऱ्या भारताचे आराध्य प्रेरणास्थान आहे. म्हणूनच अशा प्रेरणास्थानांची हीन आणि निराधार चिकीत्सा करण्याची खोड जाणूनबुजून केल्याचे दिसून येते.
भारतीय इतिहासात मेवाड राजस्थानचे महाराणा प्रतापसिंहाचे नाव नेहमीच साहस, शौर्य, त्याग आणि हौतात्म्य यासाठी प्रेरणादायक ठरलेले आहे. मेवाडच्या सिसोदिया घराण्यात राणा हमीर, बाप्पा रावल, राणा कुंभा असे अनेक शूरवीर होवून गेले. या सर्व वीरांना राणा असे संबोधिल्या जाते. पण प्रतापसिंह यांना महाराणा ही उपाधी मिळाली आहे. लेखकाने जाणीवपूर्वक एकेरी भाषा वापरून समाजाच्या या व थोर महापुरूषांचा अवमान केला आहे. याची तातडीने दखल घेऊन, सुधारणा करावी अन्यथा देशभरातून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नीता परदेशी यांनी दिला आहे.











