न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- चाकूचा धाक दाखवून चार जणांच्या टोळक्याने एका चारचाकी मोटार चालकाच्या पाकिटातील रोख रक्कम जबरदस्ती चोरून नेली. तसेच कारची काच फोडूनही नुकसान केले. मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे बुधवारी (दि. ३) रात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दशरथ भानुदास चाटले (वय २४, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास दशरथ हे त्यांच्या ताब्यातील चारचाकी मोटार घेऊन जात होते.
या वेळी दुचाकीवरून आलेल्या चौघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दशरथ यांना थांबवले. तसेच कारची काच फोडून चाकूचा धाक दाखवत दशरथ यांच्या पाकीटातील सोळा हजार रुपये जबरदस्ती चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












