- खंडणीचे प्रकार वाढल्याने औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक भयभीत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- माथाडी कामगारांच्या नावावर विविध संघटनांनी औद्योगिक क्षेत्रात दहशत माजविली आहे. पिंपरी, चिंचवड, चाकण, शिरुर, मावळ, बारामती, राजणगांवसह राज्यातही अनेक भागात साम, दाम, दंड वापरुन कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी खंडणीचे प्रकार वाढले आहेत. कंपन्यातील व्यवस्थापन, मालकांना शिवीगाळ, धमकीशिवाय गोळीबारपर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक भयभीत झाले आहेत. अनेकांना महिन्याकाठी धमकावून खंडणी म्हणून हप्ते मागितल्याने एमआयडीसीत गुंडाचे स्वतंत्र माफियाराज सुरु झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
याबाबत पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉर्मस, सर्विसेस ॲन्ड ॲग्रीकल्चरलचे अध्यक्ष ॲड. आप्पासाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हा चेअरमन प्रेमचंद मित्तल, खनिजदार विनोद बन्सल, संचालक विनोद बन्सल आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले की, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना माथाडी संघटनांना आवर घालण्याची मागणी करत आहोत. आता भाजप-शिवसेना युती सरकारने देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक कंपन्यांची गुंतवणूक करण्यात धजावत नाहीत.
माथाडी उद्योग क्षेत्रातून हटवण्याची मागणी आम्ही सातत्याने पत्रव्यवहार राज्य शासनाकडे केला आहे. त्याकडे शासनाने देखील दुर्लक्ष केलेले आहे. औद्योगिक क्षेत्रातील माथाडी संघटनाची दहशत संपवण्यासाठी माथाडी कायदा कामगार कायद्यात वर्ग करावा, माथाडी बोडर्स, माथाडी शासन सल्लागार समिती रद्द कराव्यात, जेणेकरुन असंघटीत कामगार कायद्यांच्या सुरक्षित कक्षेत येवून त्यांना न्याय मिळेल, अशी मागणी पिंपरी चिंचवड उद्योजक संघटनेकडून करण्यात आली आहे.















