- पक्षातील इच्छुकांची भाऊगर्दी व उमेदवारांबाबत संभ्रम पडणार पथ्यावर
- विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे मनसेला पुन्हा राजकीय पटलावर आणतील
- शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा दावा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. सध्या पिंपरीत शिवसेनेचा आमदार आहे. चिंचवडमध्ये भाजप व भोसरीत अपक्ष असे तीन आमदार आहेत. सध्या शहरात भाजपचीच चलती असतानाही, शहर मनसेकडून आगामी विधानसभेसाठी पिंपरीतून दोन व चिंचवडमधून १ असे तब्बल तीन विद्यमान नगरसेवक इच्छुक आहेत.
भाजप व शिवसेना पक्ष वगळता यंदा राज्यात इतर सर्वच पक्षांना विधानसभा निवडणूक डोकेदुखी ठरणार, अशीच चिन्हे सर्वत्र दिसतात. कारण विरोधी पक्षातील अनेक मातब्बर आयात उमेदवारांना भाजप शिवसेनेने आपल्या कंपूत सामील करून घेतलेले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना मातब्बर उमेदवारांची चणचण भासणार यात शंकाच नाही. पिंपरी चिंचवड शहरातील पक्षांनाही हाच नियम लागू पडतो. मात्र, शहर मनसेने आपली वेगळीच छाप शहरावर सोडल्याचे पहावयास मिळते. यात राज ठाकरे यांचा सर्वाधिक करिष्मा आहेच म्हणा….
शहरातील काही पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्यामुळे आपल्याला या विधानसभेत संधी मिळणार नाही. तसेच मुख्य विरोधी पक्ष उमेदवारांबाबत अद्यापही संभ्रमातच आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत उमेद्वारच्या पराभवामुळे पक्षनेत्यांचे शहरावर कमी झालेले लक्ष, त्यांचा कोणावरच नसलेला विश्वास, याची कुणकुण लागल्यामुळे पक्षाच्या त्या विद्यमान नगरसेवकाने आपला मनसेच बरा गड्या.. अशी भूमिका घेतली आहे. या गोष्टींच्या जमा-बाकीचे गणित आजमावून या तीनही विद्यमान नगरसेवकांनी मुंबईवारी सुरु केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांना याबाबत विचारले असता, त्यांनी या वृतास अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र, या विषयाला हात घालत ते म्हणाले की, ”भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि शिवसेनेच्या राज्यातील युती सरकारवर आणि केंद्रातील एनडीए सरकारविरोधात गेली पाच वर्षे राज ठाकरे यांनी सातत्याने टीका केली. वेळोवेळी खरपूस समाचार घेत राज ठाकरे यांनी मोदी व फडणवीस सरकारच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करीत त्यांना अडचणीत आणले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे मनसेला पुन्हा राजकीय पटलावर आणतील. त्यांची ही व्यूहरचना पाहता आगामी विधानसभेसाठी इतर पक्षातील अनेक इच्छुकही येत्या काही दिवसात मनसेत सामील होतील, यात दुमत नाही”.















