न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- रिक्षाचा मुक्त परवाना बंद करण्यात यावा, परिवहन विभागाच्या अंतर्गत रिक्षा चालक मालकांसाठी स्वतंत्र महामंडळाची अमलबजावणी करण्यात यावी, इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करावेत, ओला उबेरसह बेकायदेशीर वाहतुक बंद करण्यात यावी या सह इतर विविध मागण्या बाबत महाराष्ट्र सरकारने ३० जुन पर्यंत रिक्षा संघटना प्रतिनिधी सोबत चर्चा करावी अन्यथा ९ जुलै पासुन महाराष्ट्रातील २० लाख रिक्षा चालक मालक बेमुदत संपावर जातील, अशी घोषणा ९ जुन रोजी मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात करण्यात आली होती. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री परिवहन मंत्री यांना देण्यात आले आहे. परंतु, सरकारच्या वतीने ३० जुन पर्यंत चर्चा न केल्यामुळे आणि रिक्षा चालकांचे प्रश्न न सोडविल्यामुळे पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहरातील दिड लाखपेक्षा अधिक रिक्षा चालकांसह महाराष्ट्रातील २० लाख रिक्षा चालक मालक ९ जुलै पासुन बेमुदत संपावर जाणार आहेत. हा संप सरकारने लादला असुन, संप अटळ आहे. आत्ता माघार घेणार नाही, सरकारला रिक्षा चालकांची ताकत दाखवून देऊ, असा इशारा कृति समिति महाराष्ट्र सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कामगार नेते बाबा कांबळे यांनी दिला आहे.
९ जुलै रिक्षा बंदबाबत चर्चा करण्यासाठी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रिक्षा चालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते. या वेळी शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे, दिलिप साळवे, जेकब मेत्याव, नाना गाडे, वकिल शेख, अजित बराटे, सचिन मेत्रे, अंथॉनी पंडित, कैलास वालांडे, बाळासाहेब सूर्यवंशी, एकबल शेख, नारायण लोखंडे, इजाज शेख, परवेज पठाण, शाम विटकर, दिनेश चिंचवडे, संदीप लोंढे आदी उपस्थित होते. आंदोलनास कष्टकरी कामगार पंचायत वतीने प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, संभाजी गोरे यांनी पाठिंबा दिला.
हा संप मुक्त ऑटोरीक्षा परवाने त्वरित बंद करण्यात यावे, ऑटोरीक्षा चालक कल्याणकारी महामंडलाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, वाढलेले इंश्योरेंस दर कमी करण्यात यावे, ओला उबेर अप्स कंपन्या बंद करण्यात यावे, अवैध प्रवासी वाहतूक बंद झाली पाहीजे, ऑटोरीक्षा चालकाला पब्लिक सर्वेन्ट चा दर्जा मिळावा, R.T.A. कमेटिवर ऑटोरीक्षा चालकांच्या एक प्रतिनिधि नेमन्यात यावा. या सह इतर विविध मागण्यांसाठी करण्यात येणार आहे.
९ जुलैचा बंद हा महाराष्ट्रव्यापी बंद आहे. मी महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण, विदर्भाचा दौरा करुन रिक्षा चालकांमध्ये जनजागृती केली असुन, रिक्षा चालकांचे प्रश्न न सुटल्यामुळे रिक्षा चालकांमध्ये सरकार विरोधात तिव्र नाराजी असल्याचे या दौऱ्यावेळी जाणवले. रिक्षा चालकांनी त्यांचे मत व्यक्त केले असून मुंबई, नवी मुंबई, नागपूर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, लातूर, जालना, बीड, चंद्रपूर, अकोला, भंडारा-गोंदिया सह महाराष्ट्रातील २० लाख रिक्षाचालक-मालक या संपात सहभागी होणार आहेत. ज्या संघटनांनी संपला विरोध केला आहे, त्यांनी रिक्षा चालकांसाठी काहीच केले नाही, रिक्षा चालक संपत सहभागी होऊन त्यांना उत्तर देतील, असे बाबा कांबळे यांनी सांगितले.


















