- शहरातील सदनिकांचा मालमत्ता कर ५०० चौ. फु. ऐवजी ७०० चौ. फु. माफ व्हावा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ताकर पूर्णतः माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घ्यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौरांकडे केली आहे. यावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी शहरातील सदनिकांचा मालमत्ताकर ५०० चौ. फु. ऐवजी ७०० चौ. फु. पर्यंतच्या सदनिकेचा रहिवाशी कर पुर्णत: माफ व्हावा, अशी मागणी आ. जगताप यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांनी मा. महापौर, मा. सत्तारुढ पक्षनेते, मा. सभापती स्थायी समिती, मा. विरोधी पक्षनेते, मा. सर्व गटनेते यांना दि. १५/०३/२०१८ रोजी दिलेल्या स्मरणपत्राची आठवणही करून दिलेली आहे.
भापकर यांनी आ. जगताप यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने मुंबईतील ५०० चौ. फु च्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिले होते. या संदर्भातील प्रस्ताव मुंबई महापालिकेने तसा ठराव संमत करून राज्यसरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र तो मंजूर करण्यात आलेला नाही. याची आठवण काल विधानसभेतील चर्चेत बोलताना शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून दिली. तर दुसरीकडे भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ७०० चौ. फु. पर्यंत कर माफ करण्याची मागणी विधानसभेत केली होती याचीही आठवण करून देण्यात आली. यावर भाजपच्या आमदाराची मागणी उचलून धरत मुंबईतील ७०० चौ. फु पर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेला दिली. मुंबई महापालिकेने या संदर्भातील वैधानिक कार्यवाही करून तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे त्यांना हे शक्य आहे. मात्र, इतर महापालिकांना ते शक्य नाही, असे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधी मंडळात सांगितले होते.
त्यावेळी मी आपल्या पक्षाची पिंपरी चिंचवड महापालिकेत पूर्ण सत्ता आहे. या महापालिकेचे अंदाजपत्रक सुमारे ५००० कोटींपेक्षा रुपयान पेक्षा जास्त आहे. गेली वर्षभर स्वच्छ, पारदर्शक काम भाजपा व प्रशासनाने केले आहे. मागील १० महिन्यांमध्ये सत्ता राबवीत असताना ३१ मार्च नंतरची ठेकेदारांची बिले अडवून महापालिकेचे र.रु.३०० कोटी रुपये वाचवले आहेत. त्याबाबत शहरात येवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सर्वाना शाब्बासकी ही देऊन गेले आहेत. तसेच त्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या ठेवी अल्प मुदतीच्या ठेवींमध्ये ठेवायला सुरुवात केली. आणि अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ५० कोटी जादा व्याज मनपा ला मिळाले. या आर्थिक वर्षात १०० कोटी निव्वळ व्याजापोटी मिळतील असा दावा महापालिकेने केला होता. म्हणजे ठेकेदारांची बिले अडवल्यामुळे प्रतिवर्षी र.रु. ३०० कोटी प्रमाणे पाच वर्षाची र.रु. १,५०० कोटी व अल्प मुदतीच्या ठेवीच्या व्याजापोटी प्रति वर्षी र.रु.१०० कोटी म्हणजे पाच वर्षाची र.रु. ५०० कोटी अशी एकूण तब्बल र.रु.२,००० कोटी रुपये वाचविण्याचा विक्रम पिंपरी चिंचवड महापालिका करणार आहे.
त्यामुळे राज्यातील इतर महापालीकेंची आर्थिक स्थिती काय आहे ते आम्हास ठाऊक नाही. परंतु तुमच्या स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे ५ वर्षात र.रु. २,००० कोटी महापालिकेचे वाचणार आहेत त्यामुळे आगामी मा. महापालिका सभेत मुंबई महापालिकेच्या धरतीवर पिंपरी चिंचवड शहरातील ७०० चौ.फु. फ्लॅटचा मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव ठेवून, सर्वानुमते मंजूर करून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवावा. अशी मागणी मी दि.१५/०३/२०१८ मा. महापौर, मा. सत्तारुढ पक्षनेते, मा. सभापती स्थायी समिती, मा. विरोधी पक्षनेते, मा. सर्व गटनेते यांना लेखी पत्र देऊन केली होती.
आपण दि.०५/०७/२०१९ रोजी शहरातील ५०० चौ.फु.पर्यंतच्या सदनिकेच्या रहिवाशी कर पुर्णत: माफ करणेबाबतची मागणी मा.महापौर यांच्याकडे नुकतीच केली आहे. आपल्या या जनहिताच्या मागणीचे आम्ही स्वागत करतो. मात्र ५०० चौ.फु. रहिवाशी कर माफ करण्याचा निर्णयाचा लाभ शहरातील अतिअल्प मिळकत धारकांना होणार आहे. म्हणून शहरातील ५०० ऐवजी ७०० चौ.फु. सदनिकेच्या मालमत्ता कर पुर्णत: माफ व्हावा. यासाठी आपण लक्ष घालून पाठपूरावा करावा व शहरवाशींना दिलासा देणारा निर्णय करुन घ्यावा, असे या पत्रात भापकर यांनी म्हटले आहे.
भापकर यांनी या पत्राची प्रत मा. राहुल जाधव, महापौर, पिं.चिं.मनपा, मा. एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेता, पिं.चिं.मनपा, मा. विलास मडिगेरी, सभापती स्थायी समिती, पिं.चिं.मनपा., मा. श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिं.चिं.मनपा यांनाही पाठविली आहे.


















