- ‘वन बूथ-टेन युथ’ उपक्रमाद्वारे मतदारसंघात पक्षसंघटन मजबूत करण्यावर भर
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार व माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावली असून, या वेळेस काही केल्या षटकार मारायचाच असा चंगच त्यांनी बांधला असल्याचे पहावयास मिळत आहे. पिंपरीतील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, युवा कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन ‘वन बूथ-टेन युथ’ या मोहीमेद्वारे त्यांनी मतदारसंघात पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. राष्ट्रवादी पक्षाचा आमदारही या मतदार संघात होता. पक्षाची ताकद विखुरली गेल्यामुळे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. याचे नेमके वर्म माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांना माहित आहे.
त्यामुळे त्यांनी यावेळेस सावध परंतु, आक्रमकपणे भूमिका घेत, बूथ लेवल सक्षम करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. माजी आ. अण्णा बनसोडे इच्छुक असले तरी, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तरुण उमेदवाराला संधी देण्याचे ठरविले असल्यामुळे शेखर ओव्हाळ यांना उमेदवारीसाठी कोणतीही अडचण येणार नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


















