न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- स्वच्छ भारत मिशनचा देशभर बोभाटा होत असला तरी, देशातील अनेक शहरात शौचालयाची बिकट अवस्था आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग तीन मोशी गावठाण, बोऱ्हाटे आळी परिसरात शौचालयाची उभारणी करावी, अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भालेराव यांनी महापालिका आयुक्त यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, गेली सहा महिने झाले या परिसरातील शौचालय पाडण्यात आले आहे. मोशी इथल्या रहिवाशांना शौचालय नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना उघड्यावरती शौचालयास जावे लागत आहे. शौचालय नसल्यामुळे या परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या प्रभागात सत्ताधारी भाजपचे चार नगरसेवक आहेत. शौचालयाची जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची असुन सुध्दा येथील स्थानिक नगरसेवक धमकावून ती जागा हडप करायला बघत आहेत. या जागेवर शौचालयच झालेच पाहिजे. अशीच नागरिकांचीही मागणी आहे. त्यामुळे आपण या जागेवर लवकरात लवकर शौचालयाची उभारणी करून द्यावी, असे या पत्रात त्यांनी म्हटले आहे.


















