न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- पेठ हे कर्जत तालुक्यातील अत्यंत दुर्गम, सह्याद्रीच्या डोगरांनी वेढलेले गाव. रायगड तालुक्यातल्या कर्जत (पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळेमार्गे आंबिवली गावापर्यंत डांबरी रस्ता आहे. तिथून साधारण ३.५ किमी चालत डोंगराला वळसा घालत, जंगलातील अत्यंत खडतर पायवाटेने डोंगर पायथ्याशी असलेल्या घरांच्या पेठ गावात जाता येते. कोथळीगडचा हा पायथा आहे.
“निराधारांचा आनंदोत्सव” या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने सह्याद्रीच्या डोंगरकुशीत वसलेले पेठ, कोथळीगड येथील रायगड जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व गावकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. रायगड जि.प. प्राथमिक शाळेतील एकूण ५० मुलांना संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच गावातील एकूण १५० लोकांना पावसाळ्यात उपयोगी पडेल अशी रेनकोट व प्राथमिक उपचारासाठीचे लागणारे औषधे देखील वाटण्यात आले. आंबिवली गावातून सर्व साहित्य बैलगाडी च्या मदतीने वर नेण्यात आले.
शाळेचे शिक्षक मसूद सय्यद यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, बॅग आणि शैक्षणिक किट दिल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि साहित्य असलेली बॅग उघडून पाहण्यासाठी लागलेली उत्सुकता हे आपल्या समोर घडल्यानंतर नक्कीच तुम्हाला केलेल्या खर्चाची पोहोच पावती भेटली असेल आणि तुमचा खर्च योग्य ठिकाणी झाल्याचे पहावयास मिळेल. सर्व प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन टीमचे त्यांनी आभार मानले.
यावेळी प्रयत्नचे अमोल कुदळे, अमोल मोडक, प्रफुल इंगोले, निखिल शेवाळे, विशाल कुदळे, प्रमोद यादव, राजेश गवळी, सचिन सावंत, बालाजी हिंडे, निलेश महाजन, चंद्रशेखर अष्टे, गौरव शिंदे, मोहमदरफी शेख, आनंद घाटविलकर, आनंद भोसले, योगेश प्रसाद, स्वप्नील डाळिंबकर आणि प्रतिक भोसले आदी उपस्थित होते.











