- महामंडळावरील नियुक्तीबद्दल नगर जिल्ह्याच्या वतीने अमित गोरखे यांचा भव्य नागरी सत्कार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- राज्य शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे यांची नियुक्ती केली आहे. या अनुषंगाने त्यांनी नुकताच मुंबईतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशासकीय इमारतीतील मुख्य कार्यालयात अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. निवडीबद्दल पिंपरी चिंचवड शहरवासियांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. शहरातील विविध मान्यवरांनीही त्यांना शुभेच्छ्या दिल्या.
याचे पडसाद त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातही उमटले. नेवासा तालुक्याचे भूषण व जिल्ह्याचे भूमिपुत्र या नात्याने त्यांचे जंगी स्वागत करण्याकरीता अहमदनगर जिल्हा व नेवासा तालुका भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या वतीने नुकताच ‘भव्य नागरी सत्कार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील (गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांचा सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नगराध्यक्षा संगीता बर्डे, भाजपा जिल्हाचिटणीस नितीन दिनकर, भाजपा आ जा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत काळोखे तसेच मोठ्या प्रमाणात पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना गोरखे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. महामंडळास सुस्थितीत आणण्यासाठी व तळागाळातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व तस्यम १२ पोटजातीतील लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नगर जिल्ह्याने आज माझा जो भव्य नागरी सत्कार केला, त्यामुळे मी भारावून गेलो आहे. आज मी जरी शहरात स्थायिक असलो तरी, जिल्ह्यातील समाजबांधवांचे प्रेम सदैव माझ्या पाठीशी असते. ते प्रेम असेच कायम राहू द्या. समाजबांधवांचे जे काही प्रश्न असतील ते तत्काळ मार्गी लावली जातील. त्यासाठी माझा दरवाजा सताड उघडा राहील. नागरी सत्काराबद्दल गोरखे यांनी आभारही मानले.












