न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०१९) :- बांधकाम मजुरांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, बोगस नोंदणी रद्द झाली पाहिजे, अपघातात मुत्यु पावलेल्या बांधकाम मजुरांच्या वारसदारांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, धोकादायक बांधकाम साईट त्वरित बंद झाल्या पाहिजेत. यासह इतर विविध मागण्यांसाठी संतप्त बांधकाम मजुरांनी शिवाजीनगर येथील कामगार कार्यलयात ठिय्या आंदोलन करून कार्यालच्या गेटवर ठिय्या मांडत, कार्यालयाचे कामकाज बंद पाडुन, तिव्र संताप व्यक्त करत आंदोलन केले. सहायक कामगार आयुक्त पनवेलकर यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दुपारी १ ते ३ असे दोन तास आंदोलक कार्यालयात ठिय्या मांडुन बसले होते.
कष्टकरी कामगार पंचायत वतीने हे आंदोलन करण्यात आले. पंचायत अध्यक्ष कष्टकर्यांचे नेते बाबा कांबळे यांनी आंदोलनाचे नेतुत्व केले. यावेळी योगिता शिंदे, आशा कांबळे, प्रीती रोडे, अनिसाबी खाटीक, अप्सर शेख, अंजुबाई रोठोड, अविदा वाळुंजकर, विदया गंज, मंजुळा कांबळे, मंगल शेरे, लालचंद पवार, मुक्तीराम जावळे, रोहित गायकवाड, अनिता गोरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने बांधकाम मजुरांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले असुन, या मंडळात सात हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम पडुन आहे. पुणे येथे भिंत पडून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये २५ कामगारांचा मृत्यू झाला. पिंपरी येथे शासनाची योजना असलेल्या म्हाडाच्या साइटवर एक अपघात होऊन एका कामगारांचा मृत्यू झाला असून दोन कामगार गंभीर जखमी आहेत. अशाप्रकारे सर्रासपणे बांधकाम मजुरांचे अपघात होत असून, ज्या बांधकाम मजुरांचे अपघात झाले आहेत त्यांची मात्र बांधकाम कामगारांमध्ये नोंदणी असल्याचे दिसून येत नाही. यामुळे या बांधकाम मजुरांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही. तसेच शासनानी २९ कल्याणकारी योजना जाहीर केल्या असुन, नोंदणीकृत कामगारांस या योजनेचा लाभ दिला जात आहे.
परंतु, प्रत्यक्ष मात्र, खऱ्या बांधकाम मजुरांची नोंदणी करण्याऐवजी संबधित अधिकारी यांनी संगतमत करून बोगस लाभार्थीची नोंदणी केली असुन प्रत्यक्ष बांधकाम करणारे खरे मजूर मात्र या योजनेपासुन वंचित आहेत. खऱ्या लाभार्थींची नोंदणी करण्यात यावी, नोंदणी पद्धत आणि लाभ देण्याची प्रकिया सुलभ करावी, यासाठी संघटनेच्या पदाधिकारी यांनी कार्यालयातील संबधित अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली असता संबधित अधिकारी श्रीमती निकम मॅडम यांनी उडवाउडवीची उत्तरे देत बांधकाम योजनेचा लाभ देण्यासाठी पैशाची मागणी केली. यामुळे संतप्त मजुरांनी याबाबत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्याकडे तक्रार केली असता बाबा कांबळे यांनी तातडीने कामगार कार्यालयात धाव घेऊन मजुरांसोबत ठिय्या आंदोलन केले. बांधकाम मजुरांचे प्रश्न न सुटल्यास या पेक्षा तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा बाबा कांबळे यांनी दिला.















