न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०१९) :- हिंजवडी व परिसरातून मोटारसायकल चोरी करणा-या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीच्या १५ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. दोन्ही आरोपींना शनिवारी (दि. १३) सायंकाळी जेरबंद करण्यात आले होते. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिन महेबुब शेख (वय २२, रा. श्रीरामनगर, पिंपळे निलख) व रियाझ सिकंदर शेख (वय २२, रा. खाटपे वाडी, भुकुम, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचारी व अधिकारी शनिवारी (दि. १३) सायंकाळी गस्त घालत असताना आमिन महेबुब शेख व रियाझ सिकंदर शेख संशयितरित्या वावरताना आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मोटारसायकल चोरीचा प्रकार उघडकीस आला.
त्यांनी हिंजवडी व परिसरातून ५ लाख १५ हजारांच्या १५ मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. त्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. दोन्ही आरोपींवर हिंजवडी पोलीस ठाण्यात ५, भोसरी पोलीस ठाण्यात १, चंतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात २, चिंचवड पोलीस ठाण्यात १ असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.