न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०१९) :- ईव्हीएमबाबत संशय असला तरी त्याचा ठोस पुरावा नाही. त्यावर चर्चा न करता विधानसभेसाठी आता बुथनिहाय नियोजन, मतदार संपर्क आणि स्थानिक नेत्यांतील समन्वयातून पक्षसंघटन करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी येथे केले.
लोकसभेतील पराभवाच्या कारणांचा शोध आणि बोध घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी त्यांनी आज तालुक्याचा दौरा केला. यावेळी तळेगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित बैठकीत ते बोलत होते.
पार्थ पवार पुढे म्हणाले की, मी पराभवाने खचून गेलो नाही. लोकसभेसाठी चांगले काम केलेल्या कार्यकर्त्यांनीही आता धीर धरावा. पुलवामा प्रकरण आणि पवार कुटुंबियांविषयी अफवांची बीजे भाजपा आणि आरएसएसने पेरली. आपण खरेच कमी पडलो का आणि त्यासाठी काय बदल करायचे यासाठी संवादाची गरज आहे. विधानसभेसाठी पुन्हा जोमाने काम करण्याचे आवाहन पार्थ पवार यांनी केले.
यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती ब्रिजेंन्द्र किल्लावाला, तुषार भेगडे, राजेश बारणे, नगरसेवक अरूण माने, बापू कदम आणि निरंजन जहागीरदार या बूथ कमिटी प्रमुखांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी पार्थ पवार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आली.











