न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०१९) :- गुरुपौर्णिमेनिमित्त जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयामध्ये ‘मातृ पाद्यपूजन’ ग्रंथपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना ‘ग्रंथ हेच आपले गुरू’ मानून कृतज्ञता व्यक्त करता यावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी गाणी सादर करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमासाठी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, तेजल कोळसे-पाटील, शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
गुरूपौर्णिमेनिमित्त प्रशालेत महर्षी व्यासमुनींच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. ‘ग्रंथ हेच गुरू’ मानून ग्रंथांचे पूजन करण्याचा अनोखा उपक्रम घेण्यात आला. तसेच शिक्षिका आणि मातांचे पाद्यपूजन करण्यात आले. याचे नियोजन मनीषा पुराणिक, जयश्री गुरव, सुमित्रा कुंभार, पल्लवी ढोरे यांनी केले होते. द्रोणाचार्य व एकलव्य या गुरूशिष्य नात्याचे धागे शिक्षिका ज्योती मोरे यांनी गोष्टीरूपाने उलगडले. तसेच अमेया पवार, गौरव नवगिरे या विद्यार्थ्यांनी गुरूचे महत्त्व सांगितले. पहिलीतील आयुष गुदाल या विद्यार्थ्याने “आई माझी मायेचा पदर” हे गीत सादर केले, तर शांभवी वाघमारे हिने गुरूविषयी प्रार्थना गात सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
सूत्रसंचालन पुष्कर गाडे या विद्यार्थ्याने, तर आभार शिक्षिका पल्लवी ढोरे यांनी मानले.















