- त्रिवेणीनगरमध्ये कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या हस्ते बचत गटांचे उद्घाटन संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात आज अनेक महिला बचत गट आहेत. परंतु, त्यांना योग्य दिशा व बचत गटाचा विस्तार व विकास याबाबींची विस्तृत माहिती मिळत नाही. त्यामुळे बचत गटांच्या नावाखाली सुरु केलेली महिला चळवळ आज दिशाहीन बनत चालली आहे. बचत गटांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळाले तरच, त्याचा डोलारा वाढून सहभागी सदस्यांना आधार मिळेल, असे कामगार नेते इरफानभाई सय्यद म्हणाले.
त्रिवेणीनगर येथे कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवार (दि. २२) रोजी सखी महिला बचत गट आणि स्तुती महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी इरफानभाई सय्यद बोलत होते. यावेळी कामगार नेते इरफानभाई सय्यद, बचत गटाच्या श्रीनिवास मॅडम, सखी व स्तुती महिला बचत गटाच्या सदस्या आदी उपस्थित होते.

इरफानभाई सय्यद बोलताना पुढे म्हणाले की, ”औद्योगिकनगरीतील कामगार वर्ग आज तुटपुंज्या वेतनावर गुजराण करीत आहे. त्यांच्या हक्कासाठी संघटना लढा देतच आहे. या कामगारांना हातभार लागावा, यानिमित्ताने या बचत गटांची स्थापना करण्यात आली. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना निरनिराळे व्यवसाय सुरु करण्यासाठी, त्यांना त्याबाबतचे मार्गदर्शना मिळावे यासाठी शासनदरबारी प्रयत्न करण्यात येतील. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठीही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. या व्यवसायातून जे काही उत्पन्न येईल याचा कामगारांच्या कुटुंबाला निश्चितच हातभार लागेल व महिलांमध्ये स्वावलंबनाची चळवळ उभी राहील. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना योग्य ते सहाय्य करण्यात येईल.
यावेळी कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या हस्ते बचत गटांच्या माध्यमातून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला पुढील दिशा मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या बचत गटातील सर्व महिला योग्य त्या व्यवसायाची उभारणी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतील व समाजापुढे एक वेगळा आदर्श उभा करतील. तसेच पुढील काळात कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटांच्या वृद्धीसाठी प्रयत्न करणार आहोत. आमच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या आमच्या भावास ज्या-ज्या वेळी गरज भासेल, त्यावेळी त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजणी ठामपणे उभ्या राहू, अशी गर्जनाही उपस्थित महिला बचत गटांच्या सदस्यांनी यावेळी केली.












