न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०१९) :- पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील दोन आरोपी औंध येथील स्पाइसर कॉलेज रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. २४) रात्री पोलिसांनी स्पाइसर कॉलेज रोड परिसरात सापळा रचून लिंगा आणि लंगडा या दोघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार देखील जप्त करण्यात आली आहे.
अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (वय २५, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी), योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (वय २०, रा. जगताप चाळ, पिंपळे गुरव), आमिन फिरोज खान (रा. मोमिनपुरा, गंजपेठ, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शहाबाज शिराज कुरेशी (रा. कासरवाडी) आणि अरबाज शेख (रा. खडकी) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी रोहीत किशोर सुखेजा (वय २६ रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
लिंगा आणि लंगडा दोघेही सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर यापूर्वी पिंपरी पोलिसांनी आमिन फिरोज खान याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील शाहबाज आणि आरबाज हे दोघेजण अद्याप फरार आहेत. अटक केलेले दोन आरोपी खडकी, सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.











