न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण तहकूब सभा आज गुरुवार (दि. २५) रोजी आयोजित केली होती. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
महासभेच्या सुरुवातीला विषयपत्रिकेवरील पहिले दोन विषय मंजूर केले. दिल्लीच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर नगरसेविका सावळे यांनी महासभा २० ऑगस्टपर्यंत तहकूब करण्याची सूचना मांडली.
उपमहापौरांनी आक्षेप घेत दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात दुमत नाही. परंतु, शहरातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा आवश्यक असल्याचे मत मांडले. त्यामुळे आजची महासभा २० ऑगस्टपर्यंत तहकूब न करता दोन दिवसांपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली. सत्तारूढ पक्षनेते म्हणाले शहरातील कचरा प्रश्नावर चर्चा करण्याची आमची कालही तयारी होती आणि आजही आहे. परंतु, काँग्रेसच्या नेत्याचे निधन झाले म्हणून श्रद्धांजली वाहून महासभा तहकूब केली नाही, असा आरोप आमच्यावर होवू नये. त्यासाठी सभा तहकूब केली जात आहे. महासभा २० ऑगस्टपर्यंत तहकूब न करता कमी कालावधीकरिता तहकूब करावी. शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनीही तहकूब सभा जास्त काळ न लांबविण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी महासभा २० ऑगस्टऐवजी ६ ऑगस्टपर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केली.
त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक व उपमहापौर यांच्यातच एकमत नसल्याचे या प्रसंगावरून दिसत आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांपासून पळ काढण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेमुळे पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप बॅकफुटवर गेल्याचे पहावयास मिळत आहे.











