न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना व कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या सुख:दु:खात सहभागी होत, त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेत आहेत.
इरफान सय्यद यांनी आज गुरुवार (दि. २५) रोजी फुलेनगर येथील ओमशांती गंगा जेष्ठ नागरिक संघास भेट दिली व जेष्ठ नागरिकांशी दिलखुलास संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.
जेष्ठ नागरिकांशी संवाद साधताना इरफान सय्यद म्हणाले की, समाज माध्यमांमध्ये गुंतून व्हच्र्युअल जगाशी संवाद साधताना कुटुंबातील व्यक्तींना घरामध्येच संवाद साधण्याचा विसर पडत चालला आहे. पूर्वी कुटुंबातील सगळे एकत्र बसून टीव्ही पाहायचे. त्यामुळे कार्यक्रमांबाबत एकत्रितरीत्या काही संवाद केला जात असे. आता मात्र प्रत्येकजण आपल्या मोबाइलमध्ये डोके घालून बसल्याने कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. त्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा वाढत चालला आहे. त्यासाठी सर्वांची मने एकत्रित आली पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करू. आगामी काळात आपल्या सर्व समस्या, सुचना आणि तक्रारींवर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्राधान्य देऊ, असे अभीवचव त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
यावेळी कामगार नेते इरफानभाई सय्यद, ओमशांती गंगा जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















