न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या पर्यटकांना शहरातील पर्यटनस्थळांची माहिती व्हावी आणि या पर्यटनस्थळांना भेट देता यावी या उद्देशाने “पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. या बससेवेचे उद्घाटन शनिवारी, दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता होणार असल्याची माहिती महापौर राहूल जाधव यांनी दिली.
पुण्यातील “पुणे दर्शन’ बससेवेच्या धर्तीवर पिंपरीतही “पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. नुकत्याच झालेल्या पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या बससेवेला मंजुरी देण्यात आली होती. या बससेवेसाठी दोन वातानुकुलीत बस पीएमपी प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रति व्यक्ती ४५० ते ५०० रुपयांच्या दरम्यान बससेवेचे भाडे आकारण्यात येणार आहे.
निगडी येथून सकाळी ९ वाजता सुटणारी बस भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातून सुटणार आहे. त्यानंतर रावेत येथील इस्कॉन मंदिर, चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चापेकर वाडा, चापेकर बंधू स्मारक, सायन्स पार्क, संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली, निगडीची दुर्गादेवी टेकडी, अप्पूघर असे फिरून ही बस देहू येथे जाईल यानंतर निगडीत परतणार आहे. तर भोसरी येथून सुटणारी बस पहिल्यांदा आळंदी येथे जाईल. यानंतर ही बस लांडेवाडी चौकातील शिवसृष्टी येथून बर्ड व्हॅली येथे पोहोचेल. यानंतर सायन्स पार्क, मोरया गोसावी मांदिर, चापेकर वाडा, मंगलमूर्ती वाडा, दुर्गादेवी टेकडी, भक्ती-शक्ती समूहशिल्प दाखवून भोसरीत परतणार आहे.












