न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०१९) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत संजय गांधी अनुदान सह राज्यशासनाच्या महसूल विभागाशी निगडीत विविध कल्याणकारी योजनांची प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विधवा, परितक्त्या तसेच घटस्फोटीत महिलांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ३४२ प्रकरणे एकाच दिवशी काल मार्गी लागली. दापोडी येथील विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम पार पडला.
संजय गांधी योजनेच्या नायब तहसिलदार विमल डोलारे, परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांच्यासह निगडी, पिंपरी-चिंचवड येथील तलाठी व मंडलाधिकारी आदी अधिकारी वर्ग या शिबिरात दिवसभर सहभागी झाले होते. तलाठी दाखला, गृह अहवाल, उत्पन्न दाखले, रेशनकार्ड संबंधित कामांचा या वेळी जागेवर निपटारा करण्यात आला.
आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, उपशहर प्रमुख तुषार नवले, शहर महिला संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, कामगार नेते इरफानभाई सय्यद, पिंपरी विधानसभा उपसंघटिका शैला पाचपुते, विभागप्रमुख शैला निकम, माजी नगरसेवक संजय नाना काटे, माजी शहर संघटिका मंगलाताई घुले, युवानेते गोपाळ मोरे, युवती सेना प्रमुख प्रतिक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके, सदस्य जयंती गायकवाड, गणेश रोकडे, धरम वाघमारे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात संपर्क नेते बाळा कदम यांनी म्हटले की, शिवसेनेने सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची व त्यांना आत्मनिर्भर करण्याची जपलेली बांधिलकी म्हणजे पक्षाचा पाया असल्याचे नमूद केले. तर आमदार चाबुकस्वार यांनी म्हटले की, पिंपरी विधानसभा या मतदारसंघातील पिंपरी, मोहननगर, आकुर्डी या तीन ठिकाणी यापूर्वी शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी झाला असून सुमारे आठ हजार नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळाला असल्याची माहिती दिली. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष नितीन घोलप यांनी सर्वांचे स्वागत केले तर संजय नाना काटे यांनी आभार मानले.












