न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०१९) :- चिखली-कुदळवाडी परिसरातील उद्योजक कचऱ्याच्या समस्येने हैराण आहेत. परिसरातील रस्ते लहान असून, उद्योजकांच्या कंपनीसमोरच मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत आहे. तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरातील कचरा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांनी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनकडे धाव घेतली. फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी उद्योजकांबरोबर तेथील परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी फॅब टेक इंजिनिअरिंगचे अमित मोहिते, उद्योजक साजिद खान, मुकेश चौधरी, प्रसाद शिंदे, गोपाल कचवे, सुरज साळवे व फोरमचे चिखली-तळवडे भागातील उद्योजक उपस्थित होते.
यावेळी उद्योजकांनी सांगितले की, परिसरामध्ये खड्ड्यांची मोठी समस्या आहे. रात्री-अपरात्री कामगार वर्ग व उद्योजकांची वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. तसेच रोडला स्ट्रीट लाईटसुद्धा कधी चालू कधी बंद अशा अवस्थेमध्ये आहेत. ड्रेनेजलाईन काही ठिकाणी फुटलेल्या अवस्थेमध्ये असून, ड्रेनेजचे सर्व पाणी रस्त्यावर येत असते. कामगारांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर असून, डेंगू, मलेरिया तसेच अनेक रोगांनी या परिसरात थैमान घातले आहे. एक तर कामाला कामगार मिळत नाहीत व आहे ते कामगार आजारी असून, कोणी गावाला जाते, असे सांगून परत येत नाही. या कारणांमुळे मजुरांचा प्रश्न बिकट बनला असून उद्योजक त्रस्त आहेत.
असोसिएशनच्या वतीने लवकरच महापालिकेकडे याबाबत पत्र-व्यवहार करून समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात येणार आहे, असे फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी उद्योजकांना यावेळी सांगितले.












