न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०१९) :- गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरासह मावळात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या-नाले धोकादायक पातळीच्या जवळपास पोहोचल्याचे चित्र सर्वत्रच पहावयास मिळत आहे. पावसामुळे शहरातील झाडी उन्मळून पडत आहेत.
निगडी परिसरातील यमुनानगर तळवडेकडे जाणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर पावसामुळे अचानक झाड कोसळून रस्ता बंद झाला. नगरसेवक सचिन चिखले यांनी त्वरित अग्निशामक विभागास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी झाडाचे अवशेष बाजूला सारीत रस्ता मोकळा केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही वेळ रस्त्यावर वाहनांची रीग लागली होती.
दुसऱ्या घटनेत प्रभाग क्र. १३ मधील सेक्टर नं. २२, संग्रामनगर व सम्राटनगर झोपट्टपट्टीमध्ये मुसळधार पावसामुळे या परिसरातील १०० ते १२० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची त्रधात्रिरपट उडाली. तसेच महापालिकेचा नाले सफाईबाबतचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा दिसून आला.
तिसऱ्या घटनेत पावसाचा जोर वाढल्याने पिंपरीतील सुभाषनगर येथील नदीशेजारील झूलेलाल घाटाच्याशेजारील ५० ते ६० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे घरातील वस्तू भिजून नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
चौथ्या घटनेत चिंचवडगावातील पवना नदीचे पाणी मोरया गोसावी मंदिरात शिरल्याने भाविकांचा गोंधळ उडाला. मोरया गोसावींच्या मंदिराचा अर्धा भाग पाण्याखाली गेल्याने भाविकांना मोरयांचे दर्शन दुरूनच घ्यावे लागत आहे.