न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०१९) :- लोणावळा येथील भुशी धरण या ठिकाणी काही तरुण पर्यटनासाठी आले. मात्र ते पाण्याच्या प्रवाहात अडकून बसले होते. त्यामुळे भीतीने त्यांची गाळण उडाली होती. या सगळ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात लोणावळा पोलिसांना यश आलं आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून याचा व्हिडिओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लोणावळा शहरात पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी काही हौशी पर्यटक हे भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून पावसाचा आनंद घेत होते. तेवढ्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि हे तरुण भुशी धरणाच्या पायऱ्यांवर अडकले. या तरुणांना वाचवण्यासाठी स्थानिक आणि पोलिसांकडे याचना करत होते. तेव्हा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, आर.व्ही.मुंडे, आणि पोलीस कॉन्स्टेबल मुंडे यांनी आपला जीव धोक्यात घालून तरुणांना वाचविण्यात यश आले आहे.















