- चाकणला विमानतळ आणून उद्योगांना नवसंजीवनी द्यावी
- उद्योजक अभय भोर यांची मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०१९) :- मुंबई-पुणे महामार्ग, पिंपरी चिंचवड शहर, चाकण व रांजणगाव एमआयडीसी या परिसरांना खेड विमानतळामुळे नवसंजीवनी मिळणार होती. विमानतळामुळे या परिसरात आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली होती. सेझ प्रकल्पामुळे गावकऱ्यांना रोजगार व स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणावर मिळायला सुरुवात व्हायला लागली असतानाच, शासनाने तकलादू विरोधाचे कारण देत अचानक खेड विमानतळ पुरंदरला हलवून औद्योगिक परिसर व विकासाचा घोट घेतला. विमानतळ पुरंदरला गेल्यामुळे या परिसराचे मार्केट्च उठले. पुरंदरसारख्या ओसाड भागात विमानतळ हलवून सरकारने असा कोणता मोठा तीर मारला. मुळात या निर्णयामुळे या परिसरातील उद्योजक आपला उद्योग परप्रांतात हलवू लागला आहे. या दळभद्रीपणाल सर्वस्वी शासनाचे नाकर्तेपणाचे धोरणच करणीभूत आहे, असा हल्लाबोल फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी पिंपरी चिंचवड व चाकण परिसराजवळ विमानतळाची घोषणा सरकारने केली होती. त्यामुळे परिसरात हजारो कोटीची गुंतवणूक व हजारो कोटीची रोजगार निर्मिती पिंपरी-चिंचवड, खेड, आंबेगाव, जुन्नर भागात होणार होती. तसेच अवसरी खुर्द शेतकऱ्यांचा एसईझेड प्रकल्पसुद्धा उभा राहणार होता. त्यामध्ये फार्मासिटिकल, आयटी, केमिकल, इलेक्ट्रिकल व अशा अनेक प्रकारच्या उद्योगांनी गुंतवणूक करण्याचे ठरविले होते. त्याला केंद्रातून तात्विक मान्यतासुद्धा मिळाली होती. परंतु, सरकारने विमानतळ पुरंदरला नेऊन उद्योजकांची आणि गुंतवणूकदारांची खूप मोठी फसवणूक केली.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव, चाकण, पिंपरी चिंचवड येथील उद्योगांच्या दृष्टीने चाकण विमानतळ गरजेचे होते. गेली कित्येक वर्षे तसे आश्वासन बाहेरील कंपन्यांना व उद्योजकांना सरकारने दिले होते. चाकण परिसरात इंडस्ट्रीज आहेत. अनेक परदेशी कंपन्या परिसरात आहेत. विमानतळाचा खरा फायदा येथील उद्योग क्षेत्राला मिळणार होता. परंतु, आता बर्याच कंपन्या गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या ठिकाणी जाण्याच्या तयारीत आहेत. तसेच चाकणच्या पुढे असणाऱ्या तालुक्यांमध्ये उच्चशिक्षित अनेक युवा-युवती आहेत. त्यांच्या रोजगाराला मोठे खिंडार पडले.
सरकारने पुन्हा फेरविचार करून, चाकण नजीकच्या परिसरात विमानतळ आणावे. जेणेकरून परिसरातील कंपन्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. पुरंदर परिसरामध्ये कोणतेही औद्योगिक क्षेत्र नाही. त्यामुळे विमानतळ तेथे नेऊन सरकार पुन्हा एकदा चूक करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला मोठे नुकसान होईल. त्यामुळे सरकारने पुन्हा विचार करून पुरंदरचे नियोजित विमानतळ चाकण परिसरात आणावे, असे या पत्रकात अभय भोर यांनी म्हटले आहे.












