न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३ ऑगस्ट २०१९) :- डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया यापासून बचाव सर्वांच्या सहकार्याने होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांनी सहभागी व्हावे. घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, डास प्रतिरोधक मलम लावावा, डासांना पळवून लावण्यासाठी धूप, उदबत्त्या, गुडनाईट यांचा वापर करावा. लांब बाह्यांचे कपडे वापरावेत. मच्छरदाणी वापरावी. साठलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे यांनी केले.
एस. एम. जोशी महाविद्यालयात डेंग्यू संदर्भात जाणीवजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, डासांची पैदास होणारी ठिकाणे व भंगार साहित्याची विल्हेवाट लावावी. घरातील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण बसवावे. घरातील पाण्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा घासून, पुसून कोरडी करावीत. मोठ्या पाणी साठ्यात गप्पी मासे सोडावेत. याबरोबरच डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया रुग्णाची माहिती महानगरपालिकेला कळवावी.
मा. प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक पांढरबळे यांनी केले. उपप्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास मा. आनंता बांदल, मा. निलांबर खरात, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रंजना खरात यांनी केले.