न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०१९) :- महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय साहित्य उशिराने मिळणार आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना रेनकोट मिळणे अपेक्षित होते. मात्र ऑगस्ट उजाडला असूनही महापालिका शाळांमध्ये रेनकोट पोहोचले नाहीत.
गेल्या दोन आठवड्यांपासून शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांना रेनकोट वाटप करणे आवश्यक होते. मात्र पावसाळ्याचे दोन महिने संपले असूनही महापालिका प्रशासनाची रेनकोट वाटप संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत फक्त २० शाळांमध्ये रेनकोट वाटप झाले असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. रेनकोट वाटप पूर्ण झाले नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.












