न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड व भोसरी या तीन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार देणार असून, तिन्ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आले असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर मेळाव्यात जाहीर दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काळेवाडी येथे आयोजित जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव अमोल मिटकरी, शेख सुभान अली मोहम्मद, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते नाना काटे, दत्ता काका साने, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे, नगरसेविका उषाताई वाघेरे, नगरसेविका निकिता कदम, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, नगरसेवक राजू बनसोडे, फजल शेख, विशाल वाकडकर, राजू मिसाळ, डब्बू आसवानी, तसेच राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक कार्यकर्ते हजारोच्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते.
सदर मेळाव्यात अजित पवार म्हणाले, सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना भाजपने प्रथम ५०० चौरस फूट नंतर एक हजार चौरस फूट क्षेत्र असलेल्या घरांचे शास्तीकर माफ केले पण पिंपरी-चिंचवड ८० ते ८५ टक्के लोकांची एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठी घरे आहेत. त्याबाबत हे सरकार काहीही बोलण्यास तयार नाही. लोकशाहीमध्ये यश-अपयश असतच. मिळालेल्या यशामुळे हुरळून न जाता विजयाची हवा डोक्यात जाऊ देऊ नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लहान-लहान कार्यकर्त्यांना देखील मोठ्या संधी दिल्या. लोकसभेचे वेळी पिंपरी-चिंचवड शहराचे झालं आता होऊ द्यायचं नाही. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आले आहेत. त्यामुळे उमेदवार लवकरच निश्चित केले जातील.
या विधानसभासाठी अनेकांकडून तिकिटाची मागणी होत आहे. पण पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोणीही रुसायचे नाही नाराज व्हायचं नाही. पक्षातून गेलेल्या उमेदवारांना परत पक्षात घेणार नाही. त्यांच्याबाबत कोण कोणीही निंदा-नालस्ती करायची नाही. पण पक्षातून गेलेल्या लोकांना परत पक्षात घेण्याचा आग्रह देखील जनतेने करू नये, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.















